Saturday, 29 March 2014

गोरा गोरा रंग तुझा
उन्हामध्ये जाळू नको
उगाचच राणी अशी
रानोमाळी हिंडू नको

अनवाणी पाय तुझे
तापलेल्या भूमीवरी
पाहुनिया बसतात
चटकेच माझ्या उरी

फुलूनिया आले झाड
मोहरांनी गंध धुंद
झाडाखाली थांब जरा
विझू दे ग सारे अंग

जरा जरा वारा घे ग
अंगावरी पदरानी
तापलेले श्वास तुझे
निवो मंद झुळुकांनी

काय तुला सांगू आणि
काय करू कळेनाचि
तुझ्यासाठी करतो मी   
पायवाट काळजाची

No comments:

Post a Comment